नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून इंडिया आघाडीच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्यात आली आहे. या भेटीत विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच एसआयआर प्रक्रियेबाबतचे आक्षेप देखील त्यांच्यासमोर मांडले जाणार असल्याचे समजते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात असण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी १५ नेत्यांच्या शिष्टमंडळासाठी राष्ट्रपतींकडे वेळ मागितला होता. मात्र, राष्ट्रपती भवनाकडून शिष्टमंडळाची संख्या दहा करण्यास सांगण्यात आले.
निवडणूक आयोग आणि एसआयआरवर आक्षेप
मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप इंडिया आघाडीतील पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली आहे. राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीत हे मुद्दे औपचारिकपणे मांडले जाणार आहेत.
राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पाठवले होते २ ऑक्टोबरला सर्वप्रथम पत्र
इंडिया आघाडीने राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी सर्वप्रथम पत्र पाठवले होते. त्यानंतर राष्ट्रपती भवनाने भेटीसाठी येणाऱ्या नेत्यांची नावे मागितली. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा पत्र देऊन ७, ८ किंवा ९ ऑक्टोबरपैकी कोणत्याही दिवशी भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती. आता शुक्रवारी दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ निश्चित झाली आहे.
इंडिया आघाडीचे खासदार शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामाची मागणी करणार
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा