सातारा उपविभागात महसूल लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ प्रलंबित महसुली दावे तडजोडीने निकाली

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राबवण्यात येत असलेल्या 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियाना'अंतर्गत सातारा उपविभागात पहिल्या टप्प्यात २५ प्रलंबित महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार महसूल प्रशासनातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा, तहसीलदार कार्यालय सातारा व जावली तसेच संबंधित मंडल अधिकारी कार्यालयांमध्ये दोन सत्रांत पहिल्या टप्प्यातील लोकअदालत पार पडली.
या लोकअदालतीमध्ये सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील रस्ता, कुळकायदा व आरटीएस अपील संदर्भातील १५ प्रकरणांत तडजोडीने निर्णय देण्यात आला. तसेच सातारा तहसीलदार व मंडल अधिकारी कार्यालयातील ८, तर जावली तहसीलदार व मंडल अधिकारी कार्यालयातील २ अशा एकूण २५ जुन्या प्रकरणांचा यशस्वी निपटारा झाला. वर्षानुवर्षे सुरू असलेले महसुली तंटे सामोपचाराने मिटल्याने वेळ व पैशांची बचत झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, या अभियानातील पुढील महसूल लोकअदालत ७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी प्रलंबित दावे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुढील बातमी
इंडिया आघाडीचे खासदार शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामाची मागणी करणार

संबंधित बातम्या