साताऱ्यात ब्लिंकिटची सेवा अचानक ठप्प; सर्व्हिस अनअव्हेलेबल मेसेजमुळे सातारकरांची धांदल, मुंडे पॅटर्न चा दणका की तांत्रिक बिघाड?
by Team Satara Today | published on : 07 October 2026
सातारा: जीवनावश्यक वस्तू अवघ्या काही मिनिटांत घरपोच करणाऱ्या ‘ब्लिंकिट’ या क्विक कॉमर्स ॲपची सेवा सातारा शहरात काल रात्रीपासून अचानक ठप्प झाली आहे. आज सकाळपासून नेहमीप्रमाणे ऑर्डर नोंदवणाऱ्या हजारो सातारकरांच्या मोबाईल स्क्रीनवर ‘सर्व्हिस अनअव्हेलेबल’ असा मेसेज झळकत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. गेल्या वर्षभरापासून देशभरातील महानगरांसह द्वितीय श्रेणी शहरांमध्ये ब्लिंकिटने आपला विस्तार वेगाने सुरू केला होता. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि पुण्यासारख्या महानगरांपुरती मर्यादित असणारी ही अतिजलद सेवा सातारा शहरात सुरू होणे, हे पुणे-मुंबईतून आलेल्या तसेच स्थानिक सातारकरांसाठी सुखावणारी बाब ठरली होती. मिठाच्या पुड्यापासून ते कपडे, सौंदर्यप्रसाधने आणि ताजी फळे-भाज्यांपर्यंत सर्व जिन्नस एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने अल्पावधीतच साताऱ्यात ब्लिंकिट कमालीचे लोकप्रिय झाले. विशेषतः सातारा शहराची भौगोलिक रचना आणि वाढती उपनगरे पाहता, ही घरपोच सेवा उपनगरातील रहिवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरत होती. अनेक कुटुंबांची सकाळची सुरुवातच या ॲपवरून येणाऱ्या दुधाच्या पिशवीने आणि दैनंदिन साहित्याने होत होती. मात्र, काल रात्रीपासून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ही सेवा अचानक बंद पडल्याने सकाळच्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यभरातील हॉटेल्ससह ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्ट यांसारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांच्या गोदामांवर (डार्क स्टोअर्स) धडक तपासणी मोहीम राबवली होती. अनेक गोदामांमधील अस्वच्छता, साठवणुकीतील त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन उघडकीस आणत अन्न व औषध विभागाने त्यांचे परवाने निलंबित केले होते. या कारवाईमुळे राज्यभरातील ऑनलाइन क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले होते. आज साताऱ्यातील सेवा अचानक बंद पडल्यानंतर, ही कारवाई तुकाराम मुंडे यांच्या दणक्याचा परिणाम आहे, स्थानिक पातळीवर परवान्यांची अडचण निर्माण झाली आहे, की केवळ एखादा तांत्रिक बिघाड आहे, याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनी प्रशासनाकडून मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसून सेवेच्या पुनरुज्जीवनाकडे नियमित ग्राहकांचे डोळे लागले आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा