सातारा : देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातार्यात सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. शाहू कला मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विकासाचा प्रवास आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकसित भारत’ घडविण्याची शपथ घेतली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली.
देशातील पायाभूत सुविधांचा विस्तार, डिजिटल क्रांती, महिला सक्षमीकरण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत शासनाबरोबरच सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ऍड. दत्ता बनकर, भाजपचे गटनेते व लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर, अविनाश कदम, फिरोज पठाण, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, माजी गटनेत्या सिद्धी पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहू कला मंदिरातून प्रारंभ झालेली ही यात्रा शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करून सेवा, विकास आणि राष्ट्रनिर्मिती’चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे.
विकासाच्या प्रवाहात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : शिवेंद्रसिंहराजे
विकसित भारत’ हे उद्दिष्ट केवळ शासनाच्या योजनांमधून साध्य होणार नाही. देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. सेवा आणि राष्ट्रनिर्मितीची भावना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम सेवा ज्योती’ यात्रेतून व्हावे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
2047 चे विकसित भारताचे लक्ष्य गाठूया : उदयनराजे
भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य समोर ठेवून देशाची वाटचाल सुरू आहे. विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवा आणि राष्ट्रहिताची भावना बळकट करून विकसित भारताचा संकल्प साकार करूया, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आवाहन केले.
सातार्यातून भारतीय जनता पक्षाच्या ‘विकसित भारत’चा संदेश; सेवा ज्योती यात्रेला उत्स्फूर्त प्रारंभ
खासदार उदयनराजे- बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत शाहू कला मंदिरातून यात्रेला सुरुवात
by Team Satara Today | published on : 07 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा