सातारा : सातारा पालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक शंकर माळवदे यांनी बुधवारी अचानक नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माळवदे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास राजीनामा सादर केला. जिल्हा प्रशासनाने तो स्वीकारला. राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे माळवदे यांनी स्पष्ट केले असले, तरी त्यांच्या अचानक निर्णयामुळे राजकीय संदर्भांची चर्चा सुरू झाली आहे.
माजी उपनगराध्यक्ष असलेले माळवदे यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव असून, अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी गेल्या सहा महिन्यांच्या पालिकेच्या कामकाजात स्वतंत्र ठसा उमटविला होता. सर्वसाधारण सभांमध्ये प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करताना नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले. सभेच्या इतिवृत्तापासून प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील त्रुटींपर्यंत त्यांनी केलेली नेमकी मांडणी चर्चेचा विषय ठरली होती.
विशेष म्हणजे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माळवदे यांनी इतर मागासवर्गीय मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील विविध राजकीय गटांची समीकरणे वेगाने बदलत असताना त्यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे.
राजीनाम्याची वेळ चर्चेचा विषय
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात असतानाच माळवदे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ वैयक्तिक कारणापुरता मर्यादित आहे की आगामी राजकीय घडामोडींशी त्याचा काही संबंध आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, माळवदे यांनी स्वतः राजीनाम्याचे कारण स्पष्टपणे वैयक्तिक असल्याचे सांगितल्याने त्यापलीकडील चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक म्हणून माळवदे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याकडे उदयनराजे गटाच्या राजकीय हालचालींच्या संदर्भातूनही पाहिले जात आहे. पालिकेतील भूमिका बदल, जिल्हा बँकेतील उमेदवारी आणि आगामी स्थानिक राजकारणाची दिशा या तिन्ही बाबींचा त्यांच्या निर्णयाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शंकर माळवदेंच्या राजीनाम्याने चर्चेला उधाण; स्वीकृत नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा
वैयक्तिक कारण’ सांगितले, मात्र राजकीय वर्तुळात विविध तर्कांना सुरुवात
by Team Satara Today | published on : 07 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा