पाटण तालुक्यातील शेडगेवाडीत विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ; घटनेमुळे विहिरीतील पाणी दूषित, गावात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था

by Team Satara Today | published on : 07 October 2026


पाटण : शेडगेवाडी (ता. पाटण) येथील गावातील विहिरीत गावातीलच एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सदर मृतदेह दोन ते तीन दिवस विहिरीतील पाण्यात असल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेमुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. मल्हारपेठ पोलिसांनी मंगळवारी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दत्तात्रय कृष्णा थोरात (वय ३५, रा. शेडगेवाडी, ता.पाटण) असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नितीन राजाराम यादव (रा. शेडगेवाडी) यांनी मल्हारपेठ पोलिसांत खबर दिली. त्यानुसार दत्तात्रय थोरात हे दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी शेडगेवाडी येथील गावातील विहिरीत पाण्यात पडून मृत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह विहिरीत दोन ते तीन दिवस राहिल्याने विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत. या अकस्मात मृत्यूचा पुढील तपास मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पाटील करीत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, विहिरीतील पाणी वापरता येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांनी दूषित पाण्याचा वापर करू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेच्या जलसमृद्ध अभियानाला खटाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; दुष्काळमुक्तीसाठी विविध कामांना गावागावांत वेग
पुढील बातमी
लोकांच्या प्रेमामुळेच जिल्हा बँकेत मी बिनविरोध : खा. उदयनराजे भोसले, नावरूपाला आलेल्या बँकेत कुठल्याही प्रकारचे राजकारण आणू नये

संबंधित बातम्या