फलटण : भूतबाधेची भीती दाखवून जादूटोण्याचा बनाव करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना फलटणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सौरभ मदने याची पीडित मुलीच्या कुटुंबाशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगून जादूटोणा करून ते उतरवण्याचा बनाव केला. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुलीला एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे भीती आणि मानसिक त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. ती एका अनोळखी व्यक्तीला आढळल्यानंतर त्याने तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध पोक्सो कायदा तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
फलटणमध्ये भूतबाधेची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भोंदूबाबाविरुद्ध पोक्सोसह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा
by Team Satara Today | published on : 07 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा