सातारा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अभय केंद्र व संरक्षण अधिकारी कार्यालय, तालुका महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ५ ऑक्टोबर रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक ३ येथे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, बाल संरक्षण समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांना महिला व बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ आणि हुंडा प्रतिबंध कायदा (२० जून १९६१) या महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच बालकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बाल संरक्षण कायद्यांविषयी उपस्थितांना जागृत करण्यात आले.
तसेच, गरजू व अनाथ बालकांच्या संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’ची माहिती देऊन नागरिकांनी व पालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमामुळे शाळा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये महिला व बाल हक्कांच्या संरक्षणाबाबत मोलाची जनजागृती झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती; विविध कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा