सातारा : फळपिकांना बाजारमूल्य चांगले असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची मोठी संधी उपलब्ध होते. मात्र, अनिश्चित हवामानामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन फळपिकांना हवामानाच्या धोक्यांपासून विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनामार्फत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
सन २०२६-२७ च्या अंबिया बहारासाठी सातारा जिल्ह्यात डाळिंब, केळी, आंबा, द्राक्ष, पपई आणि स्ट्रॉबेरी या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असून योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित विमा हप्ता शासनाकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे अल्प विमा हप्ता भरून फळपिकांना विमा संरक्षण मिळणार आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा उतरवायच्या शेताचा ७/१२ उतारा व ८-अ खाते उतारा घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे, त्या बँकेत विमा हप्ता भरावा. सार्वजनिक सुविधा केंद्र तसेच विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ७/१२ उतारा उपलब्ध नसल्यास संबंधित शेतात अधिसूचित फळपीक असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल पीक सर्वेक्षणात पिकाची नोंद करणे तसेच फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा