पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. सलग पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला. "सरकारने उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत (कॅबिनेट) विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्यात एकही चाक फिरू देणार नाही," असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, येथे जमलेली मुले ही शेतकरी आणि कष्टकऱ्यांची लेकरे आहेत. दुष्काळात शेती करपलेली असताना मायबाप पोटाला चिमटा काढून मुलांना पुण्यात अधिकारी बनवण्यासाठी पाठवतात. अशा गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची सरकारने राखरांगोळी करू नये. सरकारने पारदर्शकता ठेवून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हवा असल्यास किंवा परीक्षा पद्धतीत बदल हवे असल्यास सरकारने तातडीने निर्णय घेऊन या मुलांची मने जिंकली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या या लढ्याला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. "विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलं की लगेच त्याला राजकीय वळण दिले जाते. हे आंदोलन राजकारणापलीकडचे असून सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे," असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्वाची भूमिका घेऊन या मुलांना न्याय द्यावा, असे आवाहन करतानाच, आंदोलनाची दखल न घेतल्यास पुण्यातून हे आंदोलन थेट मुंबईत नेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू; राज्य सरकारला जरांगेंचा इशारा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा