डीसीसी बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसले, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

by Team Satara Today | published on : 06 October 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या घडामोडीत महायुतीचे दोन प्रमुख दिग्गज नेते, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. 
गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पवार यांनी आव्हान उभे केले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ज्ञानेश्वर पवार यांनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. छत्रपतींच्या गादीचा मान राखण्यासाठी आणि यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांतील परंपरा आणि सन्मान कायम ठेवण्याच्या हेतूने आपण या शर्यतीतून माघार घेत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यामुळे उदयनराजे भोसले यांनी या मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा बिनविरोध विजय मिळवण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 
दुसर्‍या बाजूला, खासदार नितीन पाटील यांच्या विरोधात वाईमधून दीपक ननावरे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्जदेखील मागे घेण्यात आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या एकूण 21 संचालक पदांसाठी ही पंचवार्षिक निवडणूक पार पडत असून, या घडामोडीमुळे महायुतीने निवडणुकीत बिनविरोध निवडीचे खाते उघडले आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या या बँकेच्या निवडणुकीतील या प्रमुख बिनविरोध निवडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभाग पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती
पुढील बातमी
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मिस्टर रामराजेंची मध्यरात्री धावपळ

संबंधित बातम्या