ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत ‘काटा बंद’! अजिंक्यतारा सुरू केल्यास जिल्ह्यातील एकही कारखाना चालू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

by Team Satara Today | published on : 05 October 2026


सातारा : ऊस दराचा प्रश्‍न निकाली निघेपर्यंत साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करू नये. अजिंक्यतारा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘काटा बंद’ आंदोलन छेडून जिल्ह्यातील एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. अजिंक्यतारा कारखान्याला भेट देऊन त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली.
इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर 70 रुपये करण्यासह साखरेची एमएसपी वाढवावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. पेट्रोलचे दर वाढत असताना इथेनॉलचे दर मात्र वाढविले जात नाहीत. दुसरीकडे साखरेची एमएसपी अनेक वर्षांपासून स्थिर आहे. या धोरणामुळे शेतकरी आणि कारखानदारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकार साखर कारखाने लवकर सुरू करण्यासाठी कारखानदारांवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी सणासुदीत साखरेचे दर वाढू नयेत, बाजारात नवीन साखर उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्राची ही घाई सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकरी आणि कारखानदारांनी तोटा सहन करायचा आणि केंद्राने बाजारासाठी साखर उपलब्ध करून घ्यायची, हे मान्य नाही,’ असे शेट्टी यांनी सुनावले.
लवकर ऊस तोडणी केल्यास रिकव्हरी आणि वजन घटून शेतकर्‍यांचे एकरी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिकव्हरी आणि वजन वाढल्यानंतरच गाळप सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. कमी प्रतीचा ऊस घाईने कारखान्याला देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, 12 ऑक्टोबरला दिल्ली येथे केंद्रातील संबंधित मंत्र्यांसोबत महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. केंद्राची भूमिका पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी मोहिते यांनी, कारखाना सध्या बंद असून संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दूध उत्पादकांना दरवाढीसह तातडीच्या मदतीची राष्ट्रवादीची मागणी; दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; चारा-पशुखाद्य महागले, उत्पादन खर्च वाढला
पुढील बातमी
घरातील वादाचा थरारक शेवट; मुलीचा जीव घेणाऱ्या शिक्षक वडिलांना न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी, उपअधीक्षक विपुल पाटील यांची माहिती

संबंधित बातम्या