सातारा : जिद्द, चिकाटी आणि गिर्यारोहणाची आवड असेल तर वयाचे बंधन आड येत नाही, हे अवघ्या 11 वर्षांच्या राघव किरण मोरे याने धाडसी कामगिरीतून सिद्ध केले. सह्याद्रीतील आव्हानात्मक मानला जाणारा कलावंतीण दुर्ग आणि ऐतिहासिक प्रबळगड अशी दोन दुर्गशिखरे राघवने दोन दिवसांच्या धाडसी मोहिमेत यशस्वीपणे सर केली. सातारच्या छोट्या लेकाच्या मोहिमेचे कौतुक होत आहे.
या मोहिमेला शुक्रवारी पहिल्या दिवशी दुपारी 12 वाजता पायथ्यापासून सुरुवात झाली. दुपारी 2.30 वाजता राघव व त्याचे सहकारी प्रबळमाचीवर पोहोचले. भोजनानंतर पुढील चढाई सुरू करण्यात आली. सुमारे अर्ध्या तासाच्या चढाईनंतर कलावंतीण दुर्गाच्या खड्या आणि आव्हानात्मक पायर्यांना सुरुवात झाली. अवघ्या 20 मिनिटांत राघवने या कठीण पायर्या पार करत कलावंतीण दुर्गाचे शिखर गाठले. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास सुरक्षितपणे दुर्गाची उतराई करण्यात आली.
शनिवारी दुसर्या दिवशी सकाळी 6.30 वाजता प्रबळगडाच्या चढाईला सुरुवात झाली. अवघ्या दोन तासांत, सकाळी 8.30 वाजता राघवने प्रबळगड सर केला. दोन दिवसांच्या या मोहिमेत खड्या चढणी, अवघड पायर्या आणि रात्रीची उतराई अशा विविध आव्हानांना सामोरे जाताना राघवने आत्मविश्वास आणि धैर्य कायम ठेवले. या मोहिमेसाठी दुर्गनाद ट्रेकर्सचे संस्थापक गणेश शिंदे तसेच दुर्गनाद ट्रेकर्सच्या कोल्हापूर व सातारा टीमचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. राघवच्या पालकांनीही त्याच्या शारीरिक तयारीसह मोहिमेच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली.
कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे. प्रबळ माचीवर आदिवासी बांधवांची वस्ती आहे. वाट रुंद आणि घसरणीची असून पुढे दगडात तासलेल्या 80 अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक-दिड फूट उंच पायर्या आहेत. कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून, तिचे प्रवेशद्वार लहान आहे. पायर्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा 25 फुटांचा रॉकपॅच, पिनॅकलचा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो.
राघव हा आण्णासाहेब कल्याणी शाळेचा विद्यार्थी असून तो सध्या सहावीमध्ये शिकत आहे. त्याच्या धाडसी मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मुलांमध्ये गड, किल्ल्याबद्दल प्रेरणादायी ठरत आहे.
राघव पहिला..
लहान वयातच गड-किल्ले आणि निसर्गाची आवड जोपासणार्या राघवने या मोहिमेत दाखवलेले धाडस विशेष कौतुकास्पद ठरले आहे. अवघ्या 11 व्या वर्षी कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड सर करून त्याने बाल गिर्यारोहकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. प्राथमिक माहितीनुसार सह्याद्रीमधील हा अवघड गड चढणारा तो पहिला लहान मुलगा आहे.
सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा