खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करण्यासाठी ३ हजारांची लाच घेताना पुसेगावचा मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by Team Satara Today | published on : 05 October 2026


सातारा : खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करून मंजूर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुसेगाव (ता. खटाव) येथील मंडलाधिकारी किशोर नंदू खटावकर (वय ४३, रा. ५०९, गुरुभक्ती अपार्टमेंट, यादोगोपाळ पेठ, सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका ३२ वर्षीय तक्रारदाराने खटाव तालुक्यातील मौजे धावडदरे (कटगुण) येथील गट नंबर १९१ मधील ०.४२ आर क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी दस्ताची नोंद करण्यासाठी त्यांनी कटगुण येथील तलाठ्यांकडे अर्ज दाखल केला होता. तलाठ्यांनी नोंद करून ती मंजुरीसाठी पुसेगावचे मंडलाधिकारी किशोर खटावकर यांच्याकडे ऑनलाइन पाठवली होती. तक्रारदार यांनी मंडलाधिकारी खटावकर यांची भेट घेतली असता, खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करण्यासाठी त्यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
या प्रकरणी तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुसेगाव ग्रामपंचायत कार्यालयातील मंडलाधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, खटावकर यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला असता, पुसेगाव ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडलाधिकारी किशोर खटावकर यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
संशयित आरोपी किशोर खटावकर याला ताब्यात घेण्यात आले असून, पुसेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे, पोलीस निरीक्षक सुनील दाजी पाटील तसेच अंमलदार नितीन गोगावले, निलेश राजपूरे, निलेश चव्हाण, सत्यम थोरात आणि अजित कर्णे यांच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच उघडकीस आणली राम मंदिराच्या देणगीतील चोरी; आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर
पुढील बातमी
सात दिग्गजांच्या उमेदवारीवर कायदेशीर ‘ब्रेक’ची शक्यता; जिल्हा बँक निवडणुकीच्या छाननीत हरकतींची सरबत्ती; निर्णय राखून ठेवल्याने राजकीय गणिते पुन्हा ढवळली

संबंधित बातम्या