कराड : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीने रस्त्याच्या कडेला थांबत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. ३) दुपारी साडेचारच्या सुमारास कराड-जिंती मार्गावर कालेटेक हद्दीत घडली. जखमींपैकी तिघांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महिला पोलिस कॉन्स्टेबल अश्विनी मालोजी लामणे या पती मालोजी तानाजी लामणे (वय ३४) यांच्यासमवेत दुचाकीवरून कराडहून जिंतीच्या दिशेने निघाल्या होत्या. कालेटेक हद्दीत अश्विनी लामणे यांना मळमळ होत असल्याने मालोजी यांनी दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन थांबविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी समोरून कराडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने (एमएच ०९ जीसी ३३४०) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही वाहनांवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. मालोजी लामणे यांच्या डोक्याला, कपाळाला व चेहऱ्याला दुखापत झाली, तर अश्विनी लामणे यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीवर चालक केतन बापू लोकेरे (रा. विरळे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्यासह समीर शरदराव जगताप (वय १७) व सुनील विकास कांबळे (१८, दोघे रा. जांभूर, ता. शाहूवाडी) हेही जखमी झाले.
जखमी तिघांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव वेगाने, ट्रिपलसीट व निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केल्याचा आरोप अश्विनी लामणे यांनी कराड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालक केतन लोकेरे याच्याविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
कराड-जिंती मार्गावर कालेटेक येथे भरधाव दुचाकीची दुचाकीला धडक; महिला पोलिसासह चौघे जखमी
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा