सिप्ला फार्माच्या पुणे गोदामाचे औषध विक्री, वितरण परवाने रद्द; हायकोर्टाच्या निर्देशानंतर अन्न व औषध प्रशासनाचा मोठा निर्णय

by Team Satara Today | published on : 05 October 2026


मुंबई  : उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एफडीएने पुण्यातील वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या सी अँड एफ गोदामाचे औषध विक्री, वितरणाचे परवाने रद्द केले. कंपनीच्या 'रेक्टिन प्लस टॅब्लेट' आणि प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर जाहिरात व तपासणीत अनियमितता आढळल्याप्रकरणी निर्देशांचे पालन करत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्वीची कार्यवाही मागे घेऊन ४ सप्टेंबर रोजी सुधारित कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संस्थेने ११ सप्टेंबर रोजी लेखी उत्तर दाखल केले आणि २१ सप्टेंबर रोजी त्यांना वैयक्तिक सुनावणीची संधी दिली. या सुनावणीतील मुद्दे, तपासणीचे निष्कर्ष आणि कायदेशीर तरतुदींचा विचार करून हा स्वतंत्र निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे उद्दिष्ट केवळ कारवाई करणे नसून औषध पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखणे हे आहे. औषधांच्या गुणवत्तेशी व सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांवर यापुढे अशीच कारवाई सुरू राहील.

- तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए

'रेक्टिन प्लस टॅब्लेट' औषधावर मानवी आकृती छापील असून स्नायूंचे दुखणे, डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या वेदनांवर आरामाचा दावा करणारी जाहिरात होती. वेष्टनावरील हे दावे आणि मजकूर नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे निदर्शनास आले. उत्पादकच नव्हे तर मार्केटर म्हणूनही कंपनी वैधानिक जबाबदारी झटकू शकत नाही, असा निष्कर्ष प्राधिकाऱ्याने नोंदवला.

सिप्लाचे म्हणणे काय आहे ?
याप्रकरणी सिप्लाने प्रतिक्रिया दिली आहे. सिप्ला गुणवत्ता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेप्रती बांधिलकीवर ठाम आहे. पुण्यातील वडकी येथील सी अँड एफ केंद्राबाबत एफडीएने - घेतलेल्या निर्णयाबद्दल निराश आहोत. पुण्यातील गोदाम औषधांच्या वितरण व साठवणुकीसंदर्भातील निर्धारित - नियमांचे तसेच डिजिटल नोंदवही व्यवस्थापनाच्या मानकांचे पालन करते. आदेशाचा आढावा घेत असून, पुढील कायदेशीर व उपलब्ध पर्यायांचा विचार करत आहोत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशातील लाखो कामगारांबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय; महागाई भत्त्यात वाढ; १ ऑक्टोबरपासून किमान वेतनही वाढणार
पुढील बातमी
कराड-जिंती मार्गावर कालेटेक येथे भरधाव दुचाकीची दुचाकीला धडक; महिला पोलिसासह चौघे जखमी

संबंधित बातम्या