राज्यातील गुणवंत खेळाडूंना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण लागू

by Team Satara Today | published on : 05 October 2026


मुंबई : राज्यातील गुणवंत खेळाडूंना सरकारी नोकरीत देण्यात येणाऱ्या ५ टक्के समांतर आरक्षणाचे धोरण आजपासून लागू करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार, मंत्रालयीन विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महापालिका, नगरपालिका, शासकीय मंडळे-महामंडळे, विद्यापीठे, शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा तसेच शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या विविध संस्थांमधील गट अ, ब, क आणि ड वर्गातील सरळसेवा पदांवर ५ टक्के खेळाडू आरक्षण लागू राहणार आहे.
महाराष्ट्र सरकारने याबाबतचे धोरण अधिक कडक आणि पारदर्शक केले आहे. यापुढे केवळ क्रीडा प्रमाणपत्र दाखवून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. प्रमाणपत्राची ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीद्वारे ऑनलाइन पडताळणी बंधनकारक करण्यात आली असून, बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेला डिजिटल आणि ‘ब्लॉकचेन’ची जोड देण्यात आली आहे.
क्रीडा प्रमाणपत्रावर आता ‘क्यूआर’ची नजर
खेळाडू आरक्षणातून नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीतून जारी झालेले प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्र नसेल तर परीक्षेच्या पहिल्याच टप्प्यात अर्ज बाद केला जाणार आहे. निवड झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करून पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
यापुढे क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर संबंधित संघटनांना ३० दिवसांच्या आत अंतिम निकाल तसेच सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. ही माहिती ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी नोंदवली जाणार असून, मुदतीत माहिती न देणाऱ्या संघटनेला स्वयंचलितपणे ‘डिफॉल्टर’ यादीत टाकले जाणार आहे. त्यामुळे संघटनांच्या मनमानीला आणि प्रमाणपत्रांच्या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे.
कोणाला मिळणार आरक्षणाचा लाभ?
- ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा समाविष्ट असलेले खेळ तसेच कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
- ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांसाठी स्वतंत्र पात्रता निकष लागू राहतील.
- १७ वर्षांखालील वयोगटातील कोणतीही स्पर्धा खेळाडू आरक्षणासाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
- राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठीही सहभागाचे कठोर निकष निश्चित करण्यात आले आहेत.
- काही राष्ट्रीय स्पर्धांसाठी किमान आठ राज्यांचा, तर राज्यस्तरीय स्पर्धांसाठी किमान १८ जिल्हे किंवा ३२ संघ अथवा आठ विभागांचा सहभाग आवश्यक करण्यात आला आहे.
- सांघिक स्पर्धांमध्ये काही श्रेणींसाठी केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

नव्या शासन निर्णयामुळे आधीच्या सर्व ५ टक्के खेळाडू आरक्षणासंबंधी शासन निर्णयांना अधिग्रहित करण्यात आले आहे. मात्र, जुन्या धोरणानुसार पात्र असलेल्या खेळाडूंना मोठी संधी देण्यात आली आहे. त्यांनी शासन निर्णयाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत आपल्या क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळून घेणे बंधनकारक आहे. ऑफलाईन पडताळणी झालेल्या प्रमाणपत्रांचीही ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर ऑनलाईन पडताळणी करावी लागणार आहे. तीन महिन्यांनंतर जुन्या धोरणानुसार पात्र ठरणाऱ्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्‍त्री शक्तीच्या सहभागातून जिल्हाभर ५०० वनराई बंधारे; महिला, शेतकरी, ग्रामस्थांनी उपक्रमात सहभागी व्हावे - याशनी नागराजन
पुढील बातमी
सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन्ही आयुक्तांना नोटिस; आयोगाविरोधात याचिकाच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने दिले मोठे आदेश

संबंधित बातम्या