कास : कास पुष्प पठारावरील फुलांचा बहर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या दोन कारचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला. या अपघातांत एक जण गंभीर, तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कास तलावानजीक पार्किंगच्या बाजूला कोल्हापूर येथील पर्यटकांच्या एमएच ०९ ईजी ००८९ क्रमांकाच्या कारचा अपघात झाला. कास पुष्प पठाराकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दरीत गेली. या कारमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
दुसरा अपघात कास पुष्प पठार ते अनावळे गावादरम्यान जगताप हॉटेलच्या पुढे झाला. पुणे येथील पर्यटकांच्या एमएच १२ एक्सक्यू ०७११ क्रमांकाच्या कारचा वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमीला १०८ रुग्णवाहिकेतून सातारा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कास पठार परिसरात पर्यटकांच्या दोन कारचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात; चौघे जखमी
by Team Satara Today | published on : 04 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा