साताऱ्यात कामगारांमध्ये झालेल्या वादाची माहिती विचारण्याच्या बहाण्याने सहा जणांचा सुरक्षारक्षकावर हल्ला

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : सोमवार पेठेतील एका इमारतीत रंगकाम करणाऱ्या कामगारांमध्ये झालेल्या वादाची चौकशी करण्याच्या बहाण्याने आलेल्या सहा जणांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. संबंधित सुरक्षारक्षकाला प्रथम खुर्चीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर इमारतीबाहेर नेऊन डोक्यात दगड मारण्यात आला.
प्रसाद संदीप बेंदाडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सोमवार पेठेतील एका इमारतीत रंगकाम सुरू असताना कामगारांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर तीन कामगार तेथून निघून गेले होते.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सहा युवक इमारतीत आले. त्यांनी रंगकाम करणाऱ्या कामगारांमध्ये झालेल्या वादाबाबत बेंदाडे यांच्याकडे विचारणा केली. बोलता बोलता अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. खुर्चीने पाठीवर मारहाण करण्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना इमारतीच्या बाहेर नेऊन डोक्यात दगड मारण्यात आला.
दरम्यान, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात आल्यानंतर संशयित पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून पसार झाले. तक्रारीवरून अमोल (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जखमीच्या उपचाराचा खर्च देण्याची मागणी करत शाहूपुरीतील एका व्यक्तीचे अपहरण;अन्यथा मुलाला सोडणार नाही, धमकी देत व्यक्तीला गाडीत कोंबले
पुढील बातमी
सातारा जिल्हा क्रीडा संकुलात तरुणाचा धुडगूस; डोक्यात वीट मारल्याने तरुण जखमी

संबंधित बातम्या