फलटण : तब्बल 12 लाख 80 हजारांचे हरविलेले एकूण 71 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. यामुळे तक्रारदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गहाळ तसेच हरविलेल्या फोनबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी याची गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांना सि.ई.आय.आर पोर्टल द्वारे मोबाईल शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
सर्व तक्रारीच्या अनुशंगाने सर्व तक्रारी सि.ई.आय.आर पोर्टलमध्ये अपलोड करण्यात आल्या होत्या. तरी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे मोबाईल कोणत्या ठिकाणी व कोणत्या सिमकार्डवर सुरु आहेत, याची माहीती घेण्यात आली. तपासात निष्पन्न झाले की बरेच फोन सातारा जिल्ह्याबाहेर व परराज्यात जसे कर्नाटक, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या ठिकाणी वापरले जात होते. संबंधित मोबाईल वारपरकर्त्यांशी फोनवरुन संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी समजावून ते परत घेण्यात आले. काही मोबाईल कुरिअरद्वारे, तर काही प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले.
काही तक्रारदार लांबचे असल्याने पोलीस स्टेशनला न येता त्यांचे मोबाईल कुरिअर द्वारे पाठविण्याची सोय करण्यात आलेली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत 12 लाख 80 हजारांचे एकूण 71 मोबाईल हस्तगत करण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, डी. बी. पथकाचे पो.उप.नि दीपक पवार, सि.ई.आय.आर. पोर्टलचे काम पाहणारे कर्मचारी श्रीनाथ कदम तसेच पो.हवा. नितिन चतुरे, अमोल जगदाळे, हणमंत दडस यांनी सहभाग घेतला.
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; तब्बल 12 लाख 80 हजारांचे हरविलेले एकूण 71 मोबाईल शोधून मूळ मालकांना दिले परत
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा