खटाव : खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी ग्रामस्थांनी पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभारण्याचा निर्धार केला आहे. गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावशिवारातील ओढे-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली.
या उपक्रमाची सुरुवात विसापूर ओढ्यावर वनराई बंधारा बांधून करण्यात आली. पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरावे, भूजलपातळी वाढावी आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी व्हावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
ऑक्टोबर महिन्यात गावातील विविध ओढे-नाल्यांवर तब्बल १०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या या लोकसहभागातून जलसंधारणाला चालना मिळणार असून शेतीसह गावातील पाणीप्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी आर. एच. मुल्ला, संगणक परिचालक संगीता चिंचकर, सरपंच सुवर्णा फुलचंद मदने, उपसरपंच महादेव लोंढे, वनसंरक्षण समिती अध्यक्ष विजय बिटले, सामाजिक कार्यकर्ते हरिदास जगदाळे, रामेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष धनाजी बिटले, ग्रामपंचायत सदस्य विजया मोहन कदम, कृषी बचत गट अध्यक्ष रामचंद्र जगदाळे, माजी चेअरमन तानाजी कदम, होमगार्ड विजय कदम, प्रगतशील शेतकरी अण्णा शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण यादव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळाविरुद्ध खटाव तालुक्यातील रेवलकरवाडीकरांचा एल्गार; १०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प
गावशिवारातील ओढे-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्याची सामूहिक शपथ
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा