सातारा : आजच्या संगणकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात महात्मा गांधींच्या विचारांची प्रस्तुतता काय आहे ? गांधीजींच्या विचाराचे स्थान काय आहे? आज गांधीजी हयात असते तर त्यांनी नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला असता ? सत्य-अहिंसेचा विचार नव्या माध्यमांतून तरुणांपर्यंत कसा पोहोचवला असता ? यावर विचारमंथन घडवून आणणारे दिवसभराचे विशेष शिबिर गांधी जयंतीनिमित्त 'मुक्तांगण' येथे उत्साहात पार पडले.
‘लेक लाडकी अभियान’च्या वतीने आयोजित या शिबिराला सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास १२० युवकांनी नोंदणी करून या शिबिरात सहभाग घेतला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध उपक्रमांनी रंगले.
‘युवक, तंत्रज्ञान आणि गांधीवादी विचारांचा संवाद’ या मध्यवर्ती संकल्पनेभोवती शिबिरातील उपक्रमांची आखणी करण्यात आली होती. गटचर्चा, गटचर्चेचे सादरीकरण, पथनाट्य, सोशल मीडिया रील्स व मीम्सच्या माध्यमातून गांधीविचार कसा मांडता येईल, तसेच संकल्प कार्ड कसे तयार करावे, अशा विविध कृतीशील उपक्रमांतून युवकांनी सहभाग घेतला.
या वेळी समाजवादी कार्यकर्ते मिनाज सय्यद, निसर्गप्रेमी अनुपमा करडे , शिरीष जंगम, संजीव बोंडे, ॲड. शैलाताई जाधव, अहिल्या गलांडे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी झाले.
ॲड. वर्षा देशपांडे यांनी महात्मा गांधींचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असून जगासमोर गांधीविचाराचे महत्त्व कायम असल्याचे सांगितले. मिनाज सय्यद यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक युगात सत्य, अहिंसा, श्रम प्रतिष्ठा , विकेंद्रीकरण आणि मानवी प्रतिष्ठा या सगळ्याचा पुनर्विचार करावा लागणार आहे. यासाठी गांधींनी १०० वर्षापूर्वी मांडलेला विचार मार्गदर्शक ठरणार आहे. गांधींच्या विचारातील मानवकेंद्रितता ही AI च्या विकासातील महत्वाचे मूलभूत तत्त्व होऊ शकते. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानामुळे माणूस माणसापासून दुरावू नये, तर तंत्रज्ञानाचा उपयोग माणसामाणसांना जोडण्यासाठी व्हावा, यासाठी गांधींचे विचार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संजीव बोंडे यांनी महात्मा गांधींच्या एकादशव्रतांची माहिती देत गांधीविचारातील मूल्यांची मांडणी केली.
यानंतर मुलांनी वेगवेगळ्या गटात देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नावर गांधीवादी विचारांनी आपण काय मार्ग काढू शकतो याविषयी चर्चा केली व त्याचा अहवाल सादर केला .
भोजनानंतर महात्मा गांधींचा विचार समाजापर्यंत विविध मार्गांनी असा पोहोचवता येईल यासाठी समाज माध्यमे कशी वापरता येतील रिल्स , मिम्स, छोटी नाटके, संकल्प कार्ड अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा उपयोग करून सादरीकरण केले. शेवटी प्रत्येक शिबिरार्थीने समाजजागृतीसाठी गांधी विचारांच्या मार्गाने सक्रियपणे कार्य करण्याचा दृढ संकल्प केला.
शिबिराची सांगता झाल्यानंतर ‘महात्मा गांधींसोबत चालूया ’ या फेरीचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील अनिल मोहिते यांनी फेरीचे नेतृत्व केले. ‘रघुपती राघव राजाराम’चा गजर करत 'मुक्तांगण' येथून सुरू झालेली ही फेरी राजवाड्यापर्यंत काढण्यात आली.
या फेरीत सातारा जिल्ह्यातील विविध महिला संघटना, महिला कार्यकर्त्या, सातारा जिल्हा महिला संघटना, लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गांधीविचारांचा संदेश घेऊन महिलांची ही भव्य फेरी सातारा शहरातून काढण्यात आली.
गांधी जयंतीनिमित्त आयोजित या संपूर्ण उपक्रमातून सत्य, अहिंसा, संवाद, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा आजच्या पिढीशी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर करून गांधीविचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयोग या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती बल्लाळ, केतन मोहिते, समीर मुजावर, सिंधू ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी ॲड. वर्षा देशपांडे यांनी सर्व सहभागी, कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
डिजिटल युगात गांधी विचारांची नवी हाक; गांधी जयंतीनिमित्त साताऱ्यात युवकांचे अनोखे शिबिर उत्साहात
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा