खड्ड्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

सातारा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात मल्हार पेठेत प्रशासनाचा निषेध

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : सातारा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा आता राजकीय आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला आहे. रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सातारा शहर शाखेने आज आंदोलन केले.
पक्षाचे शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली मल्हार पेठ, पंताचा गोट परिसरातील मार्गावर सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
शहरातील अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या संदर्भात नगरपालिकेच्या प्रशासनाला लेखी तसेच तोंडी स्वरूपात वारंवार सूचना देण्यात आल्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
शहरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, निकृष्ट रस्ते कामांची चौकशी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत असताना प्रशासनाकडून नेमकी कोणती कार्यवाही झाली, याचा जाब आता विचारला जात आहे. खड्डे बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि देखभाल याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्रामपंचायत हद्दीतील गॅस कामातील खोदकाम, मुरूम उत्खननाची चौकशी करा
पुढील बातमी
देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप

संबंधित बातम्या