सातारा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान करण्यात आलेले खोदकाम, त्यातून काढण्यात आलेला मुरूम तसेच ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या भरपाईच्या रकमेची चौकशी करावी, यासह विविध प्रलंबित प्रश्नांवर सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
महसूल, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, वन विभाग, जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी करून नियमानुसार कार्यवाही होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काही मागण्यांबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाल्याचे मोरे यांनी सांगितले. खंडाळा तालुक्यातील अतिट-काळसरी येथील कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी तक्रारीनंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहन व साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खरोशी, ता. महाबळेश्वर येथील सुमारे २०० एकर जमिनीच्या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणाची चौकशी करण्याबाबत प्रशासनाकडून पत्र देण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.
मौजे आष्टे, ता. सातारा येथे उरमोडी जलाशयालगत बांधण्यात आलेल्या अनधिकृत संरक्षण भिंतीबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मौजे तारळे, ता. पाटण येथील रस्त्यालगतच्या अतिक्रमणाबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोजणी शुल्क भरले असून, मोजणीची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
पुसेगाव येथे एसटी बसस्थानक उभारणीच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. या प्रकरणात अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुनावळे, ता. जावळी येथे शासनाची पूर्वपरवानगी तसेच संबंधित आदेशांचे उल्लंघन करून नोंदविण्यात आल्याचा दावा असलेले दस्त रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील अन्य प्रलंबित प्रश्नांवरही प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.
सर्व मागण्यांवर ठोस कार्यवाही होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
तलाठी प्रशांत पवार यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी..
जावळी तालुक्यातील मुनावळे, उंबरीवाडी, अंधारी-कास आणि वाघळी या गावांचे तलाठी प्रशांत पवार यांच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याचे मोरे यांनी सांगितले. सजा कार्यालयातील अनियमित उपस्थिती, नागरिकांना होणारा त्रास तसेच आर्थिक गैरप्रकारांच्या करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारींच्या अनुषंगाने तहसीलदार, जावळी यांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी सुनावणीची नोटीस काढल्याचे मोरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत हद्दीतील गॅस कामातील खोदकाम, मुरूम उत्खननाची चौकशी करा
जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा