जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला वेग; ७४ अर्ज दाखल; शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी १४ उमेदवारांनी १५ नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. चार दिवसांत तब्बल ४४१ अर्जांची विक्री झाल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी विविध मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कराड तालुका विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातून उदयसिंह विलासराव पाटील, तर खंडाळा मतदारसंघातून राजेंद्र यशवंत नेवसे यांनी अर्ज भरला. माण तालुक्यातून मनोजकुमार सदाशिवराव पोळ यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
गृह निर्माण व दूध संस्था मतदारसंघातून ज्ञानेश्वर कोंडीबा पवार यांनी अर्ज दाखल केला. विजाभज राखीव मतदारसंघातून अशोक पांडुरंग काकडे, दिनकर शंकर शिरतोडे आणि शकुंतला वसंतराव साबळे यांनी उमेदवारी अर्ज भरले. इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघातून सुभाष धनाजी नरळे यांनी अर्ज दाखल केला.
नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था तसेच पगारदारांच्या पतसंस्था मतदारसंघातून राजेश विलासराव पाटील आणि मनोजकुमार सदाशिवराव पोळ यांनी अर्ज दाखल केले. महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा राजेश पाटील व पुष्पा धनंजय पवार यांनी, तर अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून रवींद्र सर्जेराव बडेकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून अतुल सुरेश भोसले यांनी अर्ज भरला.
दरम्यान, आतापर्यंत ४९ उमेदवारांनी ७४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे एकाच मतदारसंघातून अनेक अर्ज दाखल होण्याबरोबरच काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक मतदारसंघांतून अर्ज दाखल केल्याचेही चित्र आहे. आता अंतिम दिवशी कोणकोणते दिग्गज उमेदवारी अर्ज दाखल करतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
आज अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी (दि. १) संपणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शेवटच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच निवडणूक कार्यालयात उपस्थित राहावे. समर्थक व इतर सोबत्यांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या कोणाची उमेदवारी ठरणार?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत ७४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असली तरी प्रमुख राजकीय गटांतील काही इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अंतिम दिवशी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी आणि माघारीच्या टप्प्यात प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमिनीच्या वादातून अन्याय होत असल्याचा आरोप; औंधच्या व्यक्तीचे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
पुढील बातमी
एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या