सातारा : राजेवाडीच्या रस्त्याकडेला बेवारस अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना तपासाची दिशा एका वाहनाच्या शोधामुळे बदलली. घटनास्थळापासून सातारा-पुणे महामार्गापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनापर्यंत मजल मारली. त्यानंतर मृत तरुणीची ओळख पटली आणि कौटुंबिक वादातून तिचा खून झाल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी हर्षदा हणुमंत जाधव (वय १९, रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) हिचे वडील हणुमंत दामोदर जाधव आणि चुलते बाळू अंकुश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१४ सप्टेंबरला शिरवळ-राजेवाडी मार्गावर निर्जन ठिकाणी तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीला शिरवळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांनी घातपाताची शक्यता तपासण्यास सुरुवात केली. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळाभोवतीचा परिसर तसेच शिरवळकडून पुण्याच्या दिशेने जाणारे मार्ग तपासले. पुणे, भोर, कापूरहोळ, नसरापूर आणि सातारा-पुणे महामार्गावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली. त्यातून संशयित हालचाली असलेल्या वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या वाहनाशी संबंधित व्यक्तींची माहिती घेण्यात आली.
तपासाची चक्रे फिरल्यानंतर मृत तरुणीची ओळख हर्षदा जाधव अशी झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हर्षदाला बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने वडील आणि चुलत्याने वाहनातून नेले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत व तोंडात चटणी टाकून तोंड-नाक दाबून तिचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर मृतदेह राजेवाडी परिसरात आणून टाकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या पथकाने सलग १६ दिवस तपास करून या प्रकरणाचा छडा लावला.
या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.
मृतदेहापासून वाहनापर्यंत... अनोळखी तरुणीच्या खुनाचा उलगडा, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून पोलिसांच्या हाती धागे; वडील-चुलता ताब्यात
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा