राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यात; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

by Team Satara Today | published on : 30 September 2026


मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या मनोरमा नगर येथील कार्यालयात घुसले आणि हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये प्रदीप पूर्णेकर हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत असून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेवर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यात, सामान्य माणसाचं जगणं कठीण होत चाललंय’, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
“आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुनावळे जलपर्यटन पर्यटकांसाठी खुले; साहसी खेळांचा थरार अनुभवता येणार, देशातील गोड्या पाण्यातील पहिले केंद्र

संबंधित बातम्या