ओबीसींसाठी सरकारी जागा फक्त एक रुपयात देण्याचा प्रस्ताव; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश, महाज्योतीसाठी ३०० कोटी

by Team Satara Today | published on : 30 September 2026


मुंबई: ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्याना सुविधा पुरवण्यासाठी महसूलसह सर्व शासकीय विभागांच्या जागा एक रुपये दरात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
मंत्रालयात मंगळवारी आयोजित केलेल्या ओबीसी समाज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रत्येक बैठकीत किमान दोन प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले पाहिजेत. त्याबरोबरच परदेशी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवावा. ओबीसी समाजातील आत्महत्या केलेल्या १६ नावांसह पुढील समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात यावा. महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी, वसतिगृह योजना, वनार्टी यांचे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी देण्यात यावेत, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.
वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी ओबीसी समाजाचा शासकीय सेवेतील प्रलंबित असणारा संपूर्ण बॅकलॉग त्वरित भरून काढण्याची आग्रही मागणी केली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळालाही सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 'बार्टी'च्या धर्तीवर 'क्रांतिज्योती महात्मा फुले समता भवन' सुरू करण्यात यावे व त्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करून पुढील बैठकीत सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पशुपालकांसाठी दिलासा; महाराष्ट्र वैरण विकास धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; चाऱ्याची उपलब्धता वाढणार
पुढील बातमी
दुष्काळाच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही देणार मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

संबंधित बातम्या