साताऱ्यात करंजे येथे पिस्तुलासारख्या वस्तूचा धाक दाखवत तरुणाला मारहाण; सीसीटीव्ही फुटेजवरून सहा संशयित ताब्यात

by Team Satara Today | published on : 29 September 2026


सातारा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी तरुणाला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी एकाने पिस्तुलासारख्या दिसणार्‍या वस्तूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 27 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे येथे घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले.
ऋतिक उर्फ बबल्या धनंजय पंडित (वय 23, रा. गडकर आळी, सातारा) हा महासैनिक भवनच्या रस्त्याच्या पलीकडे फोडजाई देवी मंदिराजवळील रिक्षा गॅरेजच्या शेडमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्यावेळी संशयितांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ऋतिक व त्याचा मित्र निहाल सपकाळ यांना गाठून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली.
यावेळी सुरज उंबरकर याने पिस्तुलासारखी दिसणारी वस्तू दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय मयुर राठोड व मयुर साळुंखे यांनाही धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी ऋतिक पंडित याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरज उंबरकर, प्रेम यादव, आयुष भोसले, नरेश सोनार, अरसलान पटनी व अरमान शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैदापूर परिसरात उधारीवर सिगारेट न दिल्याने महिलेचा विनयभंग; मारहाणीत दोघे जखमी
पुढील बातमी
साताऱ्यात अंगारकी निमित्त गणेश दर्शनास गर्दी; राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

संबंधित बातम्या