नोकरीच्या आमिषाने दोघांची 9 लाख 52 हजारांची फसवणूक; रॉयल शिपिंगच्या एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 29 September 2026


सातारा : रॉयल कॅरिबियन क्रूझवर किचन, फूड अँड बेव्हरेज विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांकडून एकूण 9 लाख 52 हजार रुपये स्वीकारून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ओम प्रवीण जाधव याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य तुकाराम पवार (वय 23, मूळ रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला आरोपीने रॉयल कॅरिबियन क्रूझवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याच्याकडून पैसे स्वीकारण्यात आले.
तसेच फिर्यादीचा मित्र ओंकार रामदास गायकवाड (वय 22, मूळ रा. मुढाळे, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. गोवा) याच्याकडून 3 लाख 15 हजार रुपये आणि मित्र विनय कृष्णदेव वरे (वय 22, रा. एकसर, ता. वाई, जि. सातारा, सध्या रा. गोवा) याच्याकडूनही 3 लाख 15 हजार रुपये आरोपीने स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नोकरी मिळण्यासाठी उत्तर प्रदेश येथे एसटीसीडब्ल्यू कोर्सही करून घेण्यात आला. मात्र, संबंधितांना क्रूझवर नोकरीला न लावता आरोपीने त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण 9 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
ही घटना दि. 23 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास पोवई नाका येथील रॉयल शिपिंग अँड कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी आदित्य पवार यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ओम प्रवीण जाधव (रा. श्री जय अपार्टमेंट, जुना आरटीओ रोड, कदम बाग, सूर्यवंशी कॉलनी, सदर बाजार, सातारा; मूळ रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा हद्दीतील शिवराज चौक येथील ब्रिजवर उभ्या गाडीला मोटारसायकलची धडक; तरुण गंभीर जखमी
पुढील बातमी
साताऱ्यात किराणा दुकानात कोयत्याने हल्ला; महिलेशी अश्लील वर्तन, पैसे न देता साहित्य नेण्यास विरोध केल्याने चौघांचा धुडगूस

संबंधित बातम्या