सातारा : कास पठारावरून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या सोलापूर येथील पर्यटक बसचा रविवारी रात्री यवतेश्वर घाटात भीषण अपघात झाला. घाटातील पॉवर हाऊसजवळ अचानक ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडली; मात्र बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला धडकून थांबल्याने खोल दरीत कोसळण्यापासून वाचली आणि बसमधील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले.
वीकेंडनिमित्त कास पठारावर भ्रमंतीसाठी आलेले सोलापूरचे पर्यटक खाजगी ट्रॅव्हल्स बसने साताऱ्याकडे परतत होते. यवतेश्वर घाटातील पॉवर हाऊस परिसरातील तीव्र उतारावर बस आली असता अचानक तिची ब्रेक यंत्रणा निकामी झाली. वेग नियंत्रित होत नसल्याचे लक्षात येताच चालकाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अनियंत्रित झालेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मजबूत सिमेंटच्या कठड्यावर जाऊन आदळली. हा कठडा भक्कम असल्याने बस तेथेच अडकून पडली आणि दरीत कोसळण्याचा मोठा धोका टळला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस पथकही त्वरित दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या साहाय्याने तातडीने बचावकार्य हाती घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघातामुळे घाटरस्त्यावर काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. सातारा पोलीस या घटनेची नोंद घेऊन चालकाचा जबाब नोंदवत असून, पुढील तपास सुरू आहे. घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणांवर वाहनांची तांत्रिक तपासणी करूनच प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यवतेश्वर घाटात सोलापूरच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ब्रेक फेल होऊन बस कठड्याला धडकली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा