पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श जपणारे ‘गंगासागर’ गणेशोत्सव मंडळ; सलग १७ वर्षे डीजे-गुलालमुक्त उत्सव; वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रम

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : गणेशोत्सव म्हणजे केवळ जल्लोष आणि मनोरंजन नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा संदेश देणारा उत्सवही ठरू शकतो, याचा आदर्श शाहूपुरीतील गंगासागर गणेशोत्सव मित्र मंडळाने निर्माण केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या १७ वर्षांपासून डीजे आणि गुलालमुक्त गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.
मंडळाकडून दरवर्षी छोटी आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता अभियान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग असतो. विशेष म्हणजे मंडळाच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये महिलांचीही लक्षणीय उपस्थिती आणि सहभाग राहतो.
गणेशोत्सव काळात मंडळाकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात येते. हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतो. उत्सवापुरते कार्य मर्यादित न ठेवता परिसरातील नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाण्याची परंपराही मंडळाने जपली आहे. त्यामुळे शाहूपुरीतील एक मानाचा गणपती आणि परिसराचा मानबिंदू म्हणून गंगासागर गणेशोत्सव मंडळाची ओळख निर्माण झाली आहे.
डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि गुलालाला फाटा देत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. पुढील पिढीला सामाजिक कार्याची प्रेरणा देत गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचे काम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.
संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली दादा येडे, पैलवान ऋषी भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत इंदलकर, मकरंद साळुंखे, शिरीष शिंदे, अजिंक्य बाबर, अनिकेत इंदलकर, सुरज घोरपडे, अमर वाघमळे, आकाश मोरे, संकेत इंदलकर, सिद्धांत महानवर, संदीप गावडे, प्रतिभा बाबर, सोनाली इंदलकर, रोहिणी शिंदे, राजश्री कदम, विद्या येडे, अपूर्वा बोराटे, अश्विनी पवार, मनीषा पवार, माळी काकू, कोमल साळुंखे, आशा साळुंखे, सुजाता रासकर, सुकन्या सपकाळ, लक्ष्मी इंदलकर, काजल वाघमळे, दैवशीला मोरे, सुनंदा महानवर, दिव्या केंजळे, विजया वाघमळे, दीपा जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भ्रष्टाचारमुक्ती, भेसळमुक्तीसाठी कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंचा आदर्श गरजेचा - यशेंद्र क्षीरसागर, वडूज येथील शिवम गणेशोत्सव मंडळात व्याख्यान
पुढील बातमी
साताऱ्यात मंगळवार पेठ येथे कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या