वडूज : "भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी आणि भेसळमुक्त निरोगी जीवनासाठी कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा आदर्श केवळ प्रशासनानेच नव्हे; तर समाजाने देखील घ्यावा. त्यातून जीवन निर्मळ होईल," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आणि खटाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील शिवम गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते. मंडळातर्फे अन्न व औषध प्रशासन विभागाचे महाराष्ट्राचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जीवन प्रवासावर आधारित नाटिका आयोजित करण्यात आली होती. यावेळी "भ्रष्टाचारमुक्त आणि भेसळमुक्त भारत" या विषयावर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाषचंद्र खाडे, उपाध्यक्ष अक्षय राऊत, सुप्रसिद्ध कलाकार रामभाऊ जगताप व त्यांची टीम, प्रसिद्ध रांगोळी कलाकार निलेश लोहार तसेच बालकलाकार आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. येथील लोकप्रिय शिक्षक ए.के. माने यांनी लिहिलेल्या आणि विनायक खाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या "तुका आकाशाएवढा" या नाटिकेची उपस्थित सर्वांनीच प्रशंसा केली.
श्री. क्षीरसागर यावेळी म्हणाले," प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कार्याची आपण प्रशंसा करतो. मात्र प्रशासनाची आणि समाजाची स्वतःची भ्रष्टाचाराबाबत आणि भेसळीबाबत काही कर्तव्य आहेत. प्रशासन तर स्वच्छ असलेच पाहिजे. आपल्या राज्यघटनेने याबाबत स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच समाजाने देखील भेसळीबाबत आणि आपल्या मुलांवरील संस्काराबाबत जागरूक राहायला हवे. सर्वसामान्य नागरिकांना सहजासहजी भेसळ समजू शकणार नाही. त्यासाठी आपली यंत्रणा मजबूत हवी. परंतु जे आपल्या हातात आहे त्या गोष्टी भ्रष्टाचार मुक्तीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आपण केल्या पाहिजेत.
बाहेरचे खाणे तसेच आपली कामे होण्यासाठी शॉर्टकट अवलंबून पैसे देणे या गोष्टी केल्या नाहीत तर भ्रष्टाचाराला आणि अनारोग्याला बऱ्याच प्रमाणात पायबंद बसेल .शाळेच्या आवारात विविध प्रकारचे जंक फूड विक्रीला बंदी आणणारा निर्णय श्री.मुंढे यांनी घेतला आहे. तो अत्यंत स्तुत्य आहे .परंतु त्यासाठी पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना घरात तयार केलेले सकस अन्न द्यायला हवे .संत तुकाराम महाराज यांनी "असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे" असे म्हटले आहे .तसेच संत ज्ञानेश्वरांनी "अवघाची संसार सुखाचा करीन"अशी सोळाव्या वर्षी प्रतिज्ञा घेतली. हे सर्व लक्षात घेता आणि आपले भारतीय संविधान लक्षात घेता आपले अधिकारी कर्मचारी पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक या सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखायला हवी. भावी पिढी आपण कशी घडवणार आहोत? आणि कशा प्रकारचा भारत त्यांच्या हातात देणार आहोत? हे आपल्याच संस्कारांवर अवलंबून आहे. समाज प्रबोधनाची शिवम मंडळाचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे त्यासाठी नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा."
विनायक खाडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
भ्रष्टाचारमुक्ती, भेसळमुक्तीसाठी कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंचा आदर्श गरजेचा - यशेंद्र क्षीरसागर, वडूज येथील शिवम गणेशोत्सव मंडळात व्याख्यान
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा