२० लाखांची लाच मागितल्याने पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक

by Team Satara Today | published on : 27 September 2026


पुणे : विश्रांतवाडीतील एका खासगी रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. कारवाई न करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती.
या प्रकरणी पुणे महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे सोसायटी, विमाननगर) याला अटक करण्यात आली. याबाबत एका डॉक्टर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टर महिलेचे रुग्णालय विश्रांतवाडीतील धानोरी भागात आहे. संबंधित रुग्णालयात अनियमितता असल्याबाबतचा तक्रार अर्ज पुणे महापालिकेच्या नगर रस्त्यावरील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चकोर
याच्याकडे पाठवण्यात आला होता. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी डॉ. चकोर याच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी डॉ. चकोर हा संबंधित रुग्णालयात चौकशीसाठी आला. ‘संबंधित रुग्णालयाची चौकशी करून अहवाल वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवावा लागेल. त्रुटी आढळून आल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होईल. कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच द्यावी लागेल’, असे डॉ. चकोर याने तक्रारदार डॉक्टर महिलेला सांगितले. त्यानंतर डॉ. चकोर याने तक्रारदार डॉक्टर महिलेकडून १५ हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर महिला डाॅक्टरला ३० हजार रुपये घेऊन नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी (२६ सप्टेंबर) बोलवले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. चकोर याच्या दालनाच्या परिसरात सापळा लावून ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या डॉ. चकोर याला रंगेहाथ पकडले. डॉ. चकोर याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आशुतोषला सोडा, नाहीतर मी आसामला येईन; अभिजीत दिपकेचं मुख्यमंत्री हिमंता यांना थेट आव्हान

संबंधित बातम्या