दुष्काळ दिसतोय, आणखी किती ट्रिगर पाहणार?; आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात, जालना येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

by Team Satara Today | published on : 27 September 2026


जालना  : हा सर्वात भयानक दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे, तिथे खरोखर मदत होणार का? हा प्रश्न आहे. दुष्काळाची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. अशा परिस्थितीत सरकारचं काय नियोजन आहे, हे कुणालाही माहीत नाही असं सांगत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघात केला.
जालना येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कर्जमाफी अजून कुठेही झालेली नाही. सरकारने घोषणा केली आहे मात्र त्यावर विश्वास ठेवायचा की नाही? सरकारने कर्जमाफीच्या घोषणा करूनही शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस येत आहेत. हे थांबवणं गरजेचं आहे. फक्त परीक्षेचं शुल्क माफ करून उपयोग नाही तर सर्वच शैक्षणिक शुल्क माफ होणं गरजेचं आहे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच वीज पंपाचं शुल्क माफ करून काय फायदा? विहिरीत पाणीच नाही तर कोणतं शुल्क? एल निनोचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे बेरोजगारीही वाढण्याची शक्यता आहे. काल कुणीतरी बोललं की, अंमलबजावणी व्हायला अजून वेळ लागेल. आणखी किती वेळ लागणार? आणखी किती जीव गेल्यानंतर अंमलबजावणी होणार? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ट्रिगर काय आहे? हे काय नाटक चाललं आहे? दुष्काळ दिसतोय. निवडणुकीत जाऊन घरोघरी जशी मदत मागता, तशीच आता शेतकऱ्यांना मदत करा. ट्रिगर-१, २, ३ किती ट्रिगर? कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. ज्यांची केवायसी झाली आहे, त्यांच्या खात्यावर अजूनही काहीही जमा झालेलं नाही असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"मत चोरी नाही, विरोधकांचा मेंदूच चोरीला गेलाय" : मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा, निवडणूक आयुक्तांच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढला
पुढील बातमी
आशुतोषला सोडा, नाहीतर मी आसामला येईन; अभिजीत दिपकेचं मुख्यमंत्री हिमंता यांना थेट आव्हान

संबंधित बातम्या