कोरेगाव : तळीये (ता. कोरेगाव) येथे सुमारे २०० ते २५० नागरिकांना गॅस्ट्रो सदृश्य लागण झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीतील दूषित पाण्यामुळे हा आजार उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तळीये गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काही नागरिकांनी स्थानिक पातळीवर तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. मात्र, दिवसेंदिवस अशा रुग्णांची संख्या वाढत गेल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर अनेक बाधित नागरिकांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे धाव घेतली. गावातील पाणीपुरवठा विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळेच नागरिकांना गॅस्ट्रो सदृश्य लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दूषित पाण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पाण्याची तपासणी व आवश्यक नमुने घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग तसेच तालुका प्रशासनाने तातडीने तळीये गावात धाव घेतली. आरोग्य विभागाच्या पथकाने गावात प्रत्यक्ष पाहणी करून बाधित नागरिकांची तपासणी सुरू केली. रुग्णांना आवश्यक औषधोपचार देण्यात येत असून, गंभीर अथवा अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाठार स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पळशी तसेच ग्रामीण रुग्णालय, पिंपोडे बुद्रुक येथे पाठविण्यात आले.
यावेळी कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. टकले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर गांधिले, डॉ. रायबोले, डॉ. इंगोले यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका व संबंधित अधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या पथकाकडून गावातील नागरिकांची तपासणी करून रुग्णांना आवश्यक औषधोपचार देण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना पाणी उकळून पिणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दूषित पाण्यामुळे कोरेगाव तालुक्यातील तळीये येथे गॅस्ट्रो सदृश्य लागण; २५० रुग्ण बाधित, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीतील दूषित पाण्यामुळे हा आजार उद्भवल्याचा आरोप
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा