सातारा : गणेश विसर्जनाच्या मिरवणुका संपल्या; मात्र डीजे-डॉल्बीच्या आवाजाचा राजकीय गजर अद्याप सुरूच आहे. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी व्यावसायिकांची बाजू घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करत, नियम न मोडताही कारवाई झाली असल्याचे आढळल्यास चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे डॉल्बीवरील कारवाईला आता राजकीय रंग चढला आहे.
गणेश विसर्जनाच्या काळात सातारा शहरात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी डीजे-डॉल्बी यंत्रणांची तपासणी केली. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळलेल्या काही यंत्रणांवर कारवाई करण्यात आली, तर काही डॉल्बी साहित्य जप्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉल्बी व्यावसायिकांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेत आपली बाजू मांडली.
यावेळी उदयनराजेंनी कारवाईच्या पद्धतीवरच सवाल उपस्थित केला. डॉल्बीचा व्यवसाय करणारे अनेक जण उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करतात. रोजगाराचा दुसरा पर्याय उपलब्ध असता तर त्यांनी हा व्यवसाय केला असता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जप्त करण्यात आलेले डॉल्बी साहित्य सोडविण्यासाठी आपण पोलिस प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे डॉल्बीवरील पोलिस कारवाईचा मुद्दा राजकीय चर्चेत आला असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. ध्वनीची मर्यादा शासनाने निश्चित केली असून ती तपासण्यासाठी पोलिसांकडे ध्वनिमापन यंत्रणा आहे. मोजमापात मर्यादेचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाते, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
मात्र, एखाद्या डॉल्बी यंत्रणेने निर्धारित मर्यादा ओलांडली नसतानाही कारवाई झाल्याचे पुराव्यांसह समोर आले, तर विसर्जन मिरवणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असेही देसाईंनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘नियमांची अंमलबजावणी की कारवाईतील अतिरेक?’ या मुद्द्यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
कायद्याच्या बाजूने ज्येष्ठांचा मूक संदेश
दरम्यान, डॉल्बीच्या कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात मूक मोर्चा काढून आपली वेगळी भूमिका मांडली. ज्येष्ठ डॉक्टरांसह नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजासह लेझर लाईटच्या वापरावरही निर्बंध आणण्याची मागणी केली. ध्वनिप्रदूषणाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना सहन करावा लागतो. उत्सव साजरा करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि कायदेशीर मर्यादांचा विचार होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मोर्चातून मांडण्यात आली.
ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या डीजेवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी पाळल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदनही केले. त्यामुळे एकीकडे डॉल्बी व्यावसायिकांच्या रोजगाराचा मुद्दा राजकीय पातळीवर पुढे आला असताना दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गणेशोत्सवाचा उत्साह ओसरला असला तरी डॉल्बीच्या कारवाईवरून निर्माण झालेला हा वाद आता साताऱ्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरला आहे.
डॉल्बीच्या दणदणाटावरून साताऱ्यात राजकीय रणकंदन; उदयनराजेंनी कारवाईवर घेतला आक्षेप; शंभूराज देसाईंचा ‘नियम मोडला नसेल तर चौकशी करू’चा इशारा
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा