सातारा : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात सातारा शहरातील गणरायाला अखेर निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल १९ तास रंगली. रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी असल्याने शहरातील प्रमुख चौक जल्लोषाने दुमदुमून गेले. त्यानंतर ध्वनिवर्धक बंद झाले; मात्र विसर्जनासाठी मंडळांची रांग कायम राहिल्याने मानाच्या शंकर-पार्वती गणपतीच्या विसर्जनानंतर शनिवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास मिरवणुकीची सांगता झाली.
शहरातील ८४ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी दुपारपासूनच मंडळे मोती चौकाच्या दिशेने दाखल होऊ लागली. सायंकाळनंतर मिरवणुकीला चांगलाच वेग आला. शाहूपुरी, पोवई नाका, केसरकर पेठ, गुरुवार पेठ तसेच शहराच्या पश्चिम भागातील मंडळांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक आणि बुधवार नाका परिसरात गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली.
ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण आणि ध्वनिवर्धकांवरील गाण्यांवर थिरकणारे कार्यकर्ते, असे उत्साहाचे वातावरण संपूर्ण मिरवणूक मार्गावर पाहायला मिळाले. जांभळी चौकात भाजपच्या वतीने गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांचा बंदोबस्त, नियमांकडे लक्ष
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी रात्री साडेआठच्या सुमारास मिरवणूक मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. दुसरीकडे, मिरवणूक मार्गावर ध्वनिवर्धकांचा आवाज मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र होते. रात्री बारा वाजता ध्वनिवर्धक बंद झाल्यानंतर शहरात शांतता निर्माण झाली आणि त्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया पुढे सरकली.
बुधवार नाका येथील तलावावर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने क्रेनची व्यवस्था केली होती. तराफ्यावर मूर्ती ठेवून क्रेनच्या साहाय्याने विसर्जन करण्यात आले. पालिका कर्मचारी आणि शाहूपुरी पोलिसांकडून मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना देण्यात येत होत्या.
शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ८० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यानंतर मानाच्या शंकर-पार्वती गणपतीच्या विसर्जनासाठी मिरवणूक पुढे सरकली. दुपारी पावणेएकच्या सुमारास मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर तब्बल १९ तासांचा जल्लोष संपला आणि गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मूकमोर्चाचा संदेश दणदणाटात हरवला
ध्वनिप्रदूषण आणि लेझर बीमच्या वापराविरोधात ज्येष्ठ नागरिक संघासह २१ संस्था-संघटनांनी अनंत चतुर्दशीला राजवाडा ते पोलिस करमणूक केंद्र असा मूकमोर्चा काढला होता. सुमारे दीडशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कमानी हौद परिसरात एका मंडळाने मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक सुरू केल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यास आक्षेप घेतला. पोलिसांनी सूचना केल्यानंतर ध्वनिवर्धक बंद करण्यात आला.
मात्र, काही तासांनंतर त्याच शहरात विसर्जन मिरवणुकीत पुन्हा ध्वनिवर्धकांचा दणदणाट सुरू राहिल्याने ध्वनिप्रदूषणाविरोधातील जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर पुन्हा अधोरेखित झाले.
१९ तासांच्या जल्लोषानंतर बाप्पांना निरोप; ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट; पहाटेपर्यंत रंगलेल्या मिरवणुकीची दुपारी सांगता
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा