जागावाटपात तिढा कायम राहिल्यास भाजपची स्वतंत्र लढाई; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे पक्षविरहित निवडणुकीची अपेक्षा व्यक्त होत असताना दुसरीकडे जागावाटपाचा तिढा न सुटल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवत असल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची मोट कायम राहणार की प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘ताकदीनुसार आणि सन्मानजनक पद्धतीने जागावाटप करण्याचा प्रयत्न करू. मात्र, चर्चेतून मार्ग निघाला नाही तर भाजप स्वबळावर लढेल आणि जिंकेलही,’ असा दावा गोरे यांनी केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप अवधी असल्याने भाजप, महायुतीतील मित्रपक्ष आणि पक्षांतर्गत पातळीवर चर्चा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावेत’, अशी भूमिका घेतली आहे. त्यास गोरे यांनी पाठिंबा दिला. ‘उदयनराजे आमचे नेते आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची भूमिका योग्य आहे,’ असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या कारभारावरूनही गोरे यांनी थेट प्रश्न उपस्थित केले.
ते पुढे म्हणाले निवडणूक आचारसंहिता लागू असताना शंभरहून अधिक जणांना कामावर घेण्यात आल्याचा आरोप तसेच काही कर्मचाऱ्यांना जुन्या तारखा टाकून पदोन्नती दिल्याच्या चर्चेचा त्यांनी उल्लेख केला. हे प्रकार नियमबाह्य असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘आचारसंहिता असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या कशा झाल्या? जुन्या तारखा टाकून पदोन्नती देण्यात आली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे,’ अशी भूमिका गोरे यांनी मांडली.
माण-खटावमधील जिल्हा बँकेचे सदस्य सहलीवर गेल्याच्या चर्चेलाही गोरे यांनी नकार दिला. यावर्षी भाजपकडे सर्वाधिक ठराव असल्याचा दावा करत पक्षाला निवडणुकीची चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके ठराव असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘पक्षविरहित’ भूमिकेपुढे जागावाटपाचे आव्हान
उदयनराजेंची पक्षविरहित निवडणुकीची भूमिका, महायुतीतील संभाव्य जागावाटप आणि भाजपचा स्वबळाचा इशारा यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि उमेदवारीच्या चर्चेतून महायुतीचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिवेंद्रसिंहराजेंची सावध भूमिका; बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी, चांगली चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे
पुढील बातमी
१९ तासांच्या जल्लोषानंतर बाप्पांना निरोप; ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट; पहाटेपर्यंत रंगलेल्या मिरवणुकीची दुपारी सांगता

संबंधित बातम्या