सातारा जिल्ह्यात २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; नवीन मतदारांना नाव नोंदणीची संधी; दुरुस्ती व नाव वगळण्यासाठीही अर्ज करता येणार

ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी : "मतदार सेवा संकेतस्थळ" ttps://voters.eci.gov.in/

by Team Satara Today | published on : 26 September 2026


सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुन:रीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येत आहेत. प्रारूप मतदार यादीमध्ये काही पात्र मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे समाविष्ट झालेली नसल्यास, संबंधित नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याची संधी देण्यात आली आहे.
तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये मतदार यादीतील विद्यमान नोंदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे, तसेच अपात्र किंवा आवश्यकतेनुसार नाव वगळण्यासाठीही अर्ज करता येणार आहेत. महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
विशेष शिबिरासाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी संबंधित मतदान केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय, सातारा यांनी केले आहे.
ज्या नागरिकांना मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन मतदार सेवा संकेतस्थळावरून नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा अन्य संबंधित अर्ज ऑनलाइन करता येणार आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६; पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर
पुढील बातमी
दुष्काळाच्या काळात अधिकारी मुख्यालय सोडू नका; विनापरवानगी गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई

संबंधित बातम्या