आकाशपाळण्याच्या परवान्यासाठी लाच मागणे भोवले; शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पीआय संग्राम शेवाळेसह कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

by Team Satara Today | published on : 25 September 2026


सातारा : आकाशपाळणा उभारणीच्या ना-हरकत परवान्यासाठी लाचेची मागणी करून तडजोडीअंती ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या लाच प्रकरणात तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने सातारा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका ३८ वर्षीय व्यावसायिकाने सातारा शहरातील आळूचा खड्डा येथे आकाशपाळणा लावण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ना-हरकत परवान्यासाठी अर्ज केला होता. परवान्याच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक पोळ यांना भेटले असता, त्यांनी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने नाईलाजाने १५ हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम दोन दिवसांत देण्याचे सांगितले. त्यानंतर उर्वरित १५ हजार रुपयांसाठी हवालदार पोळ यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, हवालदार दीपक पोळ यांनी पोलीस निरीक्षकांसाठी व स्वतःसाठी तडजोडीअंती ११ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याच पडताळणी दरम्यान पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनीही या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.
त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सातारा येथील राजवाडा परिसरातील जुना दवाखाना येथे एसीबीने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार दीपक पोळ याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विसावा नाका येथे दुकानात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या