सातारा : जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला उचलून तपासणीसाठी घेऊन जाण्याची वेळ आल्याने निर्माण झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ काढल्यावर संबंधित महिला वैद्यकीय अधिकार्यांनी दिव्यांग संघटनेच्या पदाधिकार्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग संघटनांच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयात आक्रमक भूमिका घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाधव यांच्या केबिनबाहेर सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. संबंधित महिला डॉक्टरांनी जाहीर माफी मागितल्यानंतर आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी मागण्यांबाबत लेखी कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी एक दिव्यांग व्यक्ती आली होती. संबंधित व्यक्तीला तपासणीसाठी उचलून न्यावे लागत असल्याचे पाहून दिव्यांग संघटनेच्या पदाधिकार्याने त्याचा व्हिडीओ काढला. यावेळी तेथील महिला वैद्यकीय अधिकार्यांनी व्हिडीओ काढण्यावर आक्षेप घेत संबंधित पदाधिकार्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला.
या प्रकाराची माहिती मिळताच दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात एकत्र आले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेरच ठिय्या मांडला. यावेळी दिव्यांगांना रुग्णालयात मिळणार्या सुविधांचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. दिव्यांगांना उपचारासाठी येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्याशी सौजन्याने वागण्याची मागणी करण्यात आली.
दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा द्या!
जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी पुरेशा व्हीलचेअर उपलब्ध करून द्याव्यात, वैद्यकीय तपासणी व उपचारामध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्यावे, त्यांच्याशी सौजन्याने संवाद साधावा तसेच आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दिव्यांग रुग्णांना स्वतःच्या पायावर चालता येत नसताना त्यांना तपासणीसाठी नेण्यासाठी नातेवाईक अथवा सहकार्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली.
ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर संबंधित महिला वैद्यकीय अधिकार्यांनी पदाधिकार्यांसमोर जाहीर माफी मागितली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाधव यांनी दिव्यांग संघटनांच्या मागण्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
या आंदोलनात अध्यक्ष अजय पवार, प्रशांत बगले, शैलेंद्र बोर्डे, बाळू ओव्हाळ, शांताराम देवरे, हरीभाऊ साळुंखे, सुरेश माने, दिलखुश गायकवाड, संतोष भोसले, ताज मुलानी, संजय प्रकाशे, बाळू ओव्हाळ, जालीम इनामदार यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांगांना दयेची नव्हे, तर सन्मानाची आणि समानतेची वागणूक हवी. रुग्णालयात येणार्या प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक सुविधा आणि प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडली.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेर दिव्यांग संघटनेचा ठिय्या; महिला वैद्यकीय अधिकार्यांकडून जाहीर माफी; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा