सातारा : साताऱ्याबरोबरच राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत सदस्यांनी एक महिन्याचा भत्ता दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एका विधायक कार्याला सुरुवात झाली आहे. तर शिक्षण समिती सभेत अनेक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके न मिळाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत अर्थ, शिक्षण, कृषी, बांधकाम या विविध समितींच्या मासिक सभा पार पडल्या. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी समितीची सभा सभापती लता कर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, सदस्य दिलीप बाबर यांच्यासह अधिकारी व इतर सदस्य उपस्थित होते. या सभेत जिल्हा परिषद सेसमधून शेतकऱ्यांना कडबाकुट्टीसाठी अनुदान देण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना विविध अवजारेही दिली जातात. याबाबतचाही ठराव सदस्यांनी मंजूर केला.
तर जिल्हा परिषद इमारत परिसर, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निवासस्थान, सभापती निवासस्थान, छत्रपती प्रतापसिंह शेती फार्म येथे शेतीविषयक मजुरीची कामे करणे आदींसाठी १९ लाख ४४ हजार रुपये निविदा रकमेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याला सदस्यांनी विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा विषय आता सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. तसेच या सभेत विविध विषयांवरही चर्चा झाली.
गणवेशाचीही गुणवत्ता ठेवावी...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सभापती तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्यासह अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या सभेत विविध निर्णय झाले. सभेत जिल्ह्यातील अनेक शाळांना अद्याप शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके न मिळाल्याबद्दल सभापती कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच संबंधित यंत्रणेने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही केली. यावेळी स्काऊट-गाईड गणवेशाच्या गुणवत्तेचाही आढावा घेण्यात आला. गणवेशाच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सभापती तेजस्विनी कदम यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला.
सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य देणार दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; महिन्याचा भत्ता दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा