मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली आहे. सूरजने दिशा सालियन आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांना आपण आयुष्यात कधीही भेटलो नसल्याचा दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाशी आपलं नाव जोडलं जात असल्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर मोठा परिणाम झाल्याचंही त्याने म्हटलं आहे.
सूरज पांचोलीने इन्स्टाग्रामवर सहा स्लाइड्सची पोस्ट शेअर करत तपास यंत्रणांनी या प्रकरणाची “पूर्णपणे, सखोल आणि कोणताही उशीर न करता चौकशी करावी”, अशी मागणी केली आहे. तपासात आपला सहभाग असल्याचा कोणताही पुरावा समोर आल्यास कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.
आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच सूरजने दिशा सालियन आणि आदित्य ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला.
“मी दिवंगत दिशा सालियन किंवा आदित्य ठाकरेंना माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाही. एकदाही नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणेही नाही,” असं सूरजने म्हटलं. गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर आपल्याबद्दल वेगवेगळे आरोप केले जात असल्याचं त्याने सांगितलं. या काळात आपल्याला शिवीगाळ करण्यात आली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्याचा दावा सूरजने केला.
“मी घाबरलेलो नाही,” असंही त्याने स्पष्ट केलं.
या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपलं नाव वारंवार त्यात ओढलं गेलं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष वाया गेल्याचं सूरजने म्हटलं. आता वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं.
“माझे कोणतेही राजकीय संबंध नाहीत”
दिशा सालियन प्रकरणातील राजकीय चर्चेवरही सूरजने भाष्य केलं आहे. आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींशी असलेल्या वादामुळे आपल्यावर टीका केली जात असल्याचा दावा त्याने केला.
मी दिशा सालियन किंवा आदित्य ठाकरेंना कधीच भेटलो नाही; दिशा सालियन प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीचा इन्स्टाग्रामवर मोठा खुलासा
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा