सातारा : लोणंद - सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-डी वरील वेण्णा आणि कृष्णा नदीवर उभे असणारे ऐतिहासिक वाढे व वडूथ येथील दगडी पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव तब्बल नऊ महिन्यांसाठी अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. स्थानिक नागरिकांची दैनंदिन गैरसोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि रुग्णांची आबाळ टाळण्यासाठी एसटी बसेस, रुग्णवाहिका, दुचाकी व चारचाकी यांसारख्या हलक्या वाहनांची वाहतूक या पुलांवरून पूर्वीप्रमाणेच अव्याहत सुरू ठेवण्यात येणार आहे.
वडूथ येथील कृष्णा नदीवरील पूल हा सन १८४५ चा, म्हणजेच थेट ब्रिटिशकालीन इतिहासाचा साक्षीदार आहे. गेल्या पावणेदोनशे वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या या पुलासह वाढे येथील वेण्णा नदीवरील पुलाच्या दगडी कमानींची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सखोल तांत्रिक पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान पुलांच्या दगडी बांधकामात पडलेले तडे, कमानींची झालेली झीज आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाझरणारे पाणी यांमुळे पुलांची मूळ संरचना अत्यंत कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. नवीन पुलांचे काम पूर्ण होईपर्यंत या जीर्ण पुलांवरून अवजड वाहने धावणे म्हणजे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण ठरत होते. या धोक्याची जाणीव ठेवून वडूथसह संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुलांवरील अवजड वाहतूक तातडीने बंद करावी आणि स्थानिक रहिवाशांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देऊन लढा उभारला होता.
या जनआंदोलनाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे कार्यकर्ते मदन साबळे यांनी प्रशासकीय पातळीवर या निर्णयाला गती मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. जिल्हा वाहतूक शाखेला प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत मंजुरी पत्राची प्रतीक्षा होती. ही बाब लक्षात येताच मदन साबळे यांनी सकाळी तातडीने एनएचएआय, पुणेचे प्रमुख सचिन गौतम यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या संभाषणाचा परिणाम म्हणून सचिन गौतम यांनी तात्काळ संबंधित अधिकृत पत्र निर्गमित केले. त्यानंतर हे पत्र तातडीने जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विकास धस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने संपूर्ण प्रशासकीय हालचालींना प्रचंड वेग आला.
या महत्त्वाच्या प्रश्नी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही संसदेच्या अत्यंत व्यस्त कामकाजात असताना नागरिकांची कैफियत अत्यंत आस्थेने समजून घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांशी सतत समन्वय ठेवत या ऐतिहासिक पुलांवरील अवजड वाहतूक बंद करतानाच स्थानिक शेतकरी, नागरिक, रुग्णवाहिका आणि एसटी बसेसची ये-जा सुरूच राहिली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडून पाठबळ दिले. यासोबतच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आवश्यक ते कायदेशीर प्रस्ताव, प्रत्यक्ष पाहणी अहवाल आणि कागदपत्रांची पूर्तता अत्यंत वेगाने पूर्ण करून अधिसूचना जारी केली. या संपूर्ण अंमलबजावणीत केसीपीएल कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक दिपेश ठाकूर, अभिषेक सिंग, हजारी यादव तसेच समन्वयक निलेश कदम आणि अजित शिंगटे यांनीही आवश्यक ती तांत्रिक मदत पुरवली आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूला आवश्यक माहिती फलक उभारण्यात आले असून, अवजड व उंच वाहने पुलावर शिरू नयेत म्हणून लोखंडी गर्डरचे उंची नियंत्रक अडथळे (हाइट बॅरियर) बसविण्यात येत आहेत. तसेच या नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून घटनास्थळी २४ तास वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत.
दरम्यान, या नऊ महिन्यांच्या दीर्घ कालावधीत अवजड वाहतुकीसाठी चोख पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. लोणंद बाजुकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने लोणंदवरून खंडाळा अथवा शिरवळमार्गे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून (NH-48) सातारा शहरात येतील. साताऱ्याकडून लोणंद आणि फलटणकडे जाणारी सर्व अवजड वाहने वाढे फाट्यावरून आत न वळता थेट महामार्गाने शिरवळ किंवा खंडाळामार्गे पुढे रवाना केली जातील. फलटणकडे जाणारी जड वाहतूक बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव, एसगाव आणि ताथवडे घाटमार्गे वळविण्यात आली असून, फलटणहून साताऱ्याकडे येणारी वाहने याच घाटमार्गे पुसेगाव व कोरेगाववरून साताऱ्यात प्रवेश करतील. याव्यतिरिक्त फलटणकडून येणाऱ्या वाहनांना आदर्की फाट्यावरून (फौजी ढाबा) पिंपोडे बुद्रुक, सर्कलवाडी, शिरगाव घाट आणि जोशीविहीरमार्गे पुणे-बंगळूर महामार्गाचा पर्यायी मार्गही खुला ठेवण्यात आला आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी वर्षानुवर्षे दाखवलेली एकजूट आणि ‘प्रश्न केवळ मांडून थांबायचे नाही, तर तो निकाली लागेपर्यंत पाठपुरावा करायचा’ या ध्येयामुळे अखेर ऐतिहासिक पुलांच्या संवर्धनाला आणि सुरक्षित वाहतुकीला मोठे यश आले आहे.
ऐतिहासिक वाढे, वडूथ पुलांवरून अखेर अवजड वाहतूक बंद; जनआंदोलन अन् पाठपुराव्याला मोठे यश, हलकी वाहने व एसटी बस मात्र सुरूच राहणार
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा