मोटारसायकल चोरट्यांचा माग काढत चार गुन्हे उघड; शाहूपुरी पोलिसांची कारवाई; तिघे ताब्यात, ३.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

by Team Satara Today | published on : 23 September 2026


सातारा : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या चार मोटारसायकली आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जगदीश दत्तात्रय दळवी (वय १९, रा. म्हाते, ता. जावळी), विक्रम शिवाजी भांडवलकर (वय २१, रा. ठाकुरकी, ता. फलटण) आणि गौरव आनंदा कदम (वय २२, रा. मालचौडी, ता. जावळी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ३० ऑगस्ट रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा रजि. नं. २७६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर परिसरातील वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना तपासाच्या सूचना दिल्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा माग काढत असताना दि. १८ सप्टेंबर रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मोळाचा ओढा परिसरातील राजपुरोहित बेकरीसमोर मोटारसायकलीसह थांबलेल्या जगदीश दळवी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी अन्य संशयिताचा शोध सुरू केला.
एसटी स्टँड परिसरातून विक्रम भांडवलकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, तर मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकली चोरी केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासातून चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज मदने करीत आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आयुष विभागामार्फत ११ वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

संबंधित बातम्या