सातारा : सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रलंबित विकासकामांसह वीज वितरण, शेती, महसूल, पाणंद रस्ते आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर सभापती महेश गाडे यांच्यासह सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सभापती श्री. गाडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी असा सूर सर्व सदस्यांनी या सभेत मांडला.
सातारा पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी (दि. २३) सभापती महेश गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसभापती सुषमा जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, बांधकाम विभागाचे अधिकारी विद्याधर शिंदे यांच्यासह पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या सभेत तालुका कृषी विभागाच्या आढाव्यात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी फॉर्म भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अनेक महिला प्रत्यक्ष शेती करीत असल्या तरी त्यांना लिहिता-वाचता येत नसल्याने ऑनलाइन किंवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. या महिलांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिला पंचायत समिती सदस्या शोभा लोटेकर यांनी केली. तसेच, वन्यप्राण्यांकडून शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी कृषी विभाग आणि वनविभागाने संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, तसेच बी-बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
तहसीलदार कार्यालयाच्या विविध योजनांची तसेच सेवा संकल्प अभियानाची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावेळी पंचायत समिती सदस्यांनी तहसीलदार कार्यालयातील सेवासुविधांबाबतही नाराजी व्यक्त केली. अनेक योजना केवळ कागदोपत्री राबवल्या जात असून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला. पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती आणि त्याबाबत झालेल्या कार्यवाहीचा खुलासा करण्याची मागणीही करण्यात आली.
तसेच, यावेळी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाची स्थिती तसेच शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना येणाऱ्या वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
खोकडवाडी व पांढरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना पाच ते सहा महिने वीजबिल न देता अचानक थकीत वीजबिलाची नोटीस का बजावण्यात आली, असा सवाल सदस्य राहुल कापले यांनी उपस्थित केला. याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. जुने वीजखांब बदलण्याबरोबरच गावठाण हद्दीतील धोकादायक व खराब झालेले सर्व वीजखांब तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली. सौरऊर्जा योजनेबाबत सर्व पंचायत समिती सदस्य तसेच शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोलर योजनेची माहिती देत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
सभेत सदस्य राहुल कापले, राहुल शिंदे, संतोष साळुंखे, मानसिंग मोरे, महिला सदस्या शोभा लोटेकर आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले. वसंतराव भंडारे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
शेतीसाठी नवीन वीज जोडण्या देण्यास विलंब का होत आहे, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. अनेक गावांमध्ये अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी केली जाते आणि त्यावर शेतीपंपांच्या मोटारी चालवल्या जातात. अधिकृत जोडणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असताना अनधिकृत वीज वापराकडे दुर्लक्ष का केले जाते, याचा खुलासा करावा, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली. पंचायत समितीच्या बैठकीत सभेच्या भोजनव्यवस्थेवरूनही सत्ताधारी गटासह विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. यावेळी वातावरण काहीसे हलकेफुलके झाले. गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी पंचायत समितीच्या सभेला कायम नाष्टयाची व्यवस्था असते. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने यावेळी जेवणाचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर सदस्यांमध्ये हसतखेळत चर्चा रंगली. या चर्चेत 'मंत्र्यांच्या काजू-बदाम आढाव्या'चाही उल्लेख झाल्याने बैठकीतील वातावरण काही काळ मिश्कील झाले.
प्रलंबित कामांवरून सातारा पंचायत समितीचे अधिकारी धारेवर; विविध विभागांच्या आढावा तयारीवर सविस्तर चर्चा
by Team Satara Today | published on : 23 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा