सातारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-डीवरील वाढे आणि वडूथ येथील वेण्णा व कृष्णा नदीवरील जुन्या पुलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सातारा, फलटण, लोणंद आणि शिरवळदरम्यानच्या अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल होणार आहे. २८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपासून २० जून २०२७ पर्यंत ही वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे.
पुलांची संरचनात्मक पाहणी केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बाबी निदर्शनास आणल्या आहेत. पावसाळ्यात पाणी पाझरणे, संरचनेवर तडे जाणे तसेच दगडी कमानीच्या काही भागांची झीज झाल्याने पुलांवरील अवजड वाहतुकीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वाहतूक बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे.
अवजड वाहतूक बंद असली तरी हलकी वाहने, एसटी बस, शाळा-महाविद्यालयीन वाहतूक तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पुलांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद होणार नाही.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
सातारा–लोणंद : साताऱ्याकडून जाणारी अवजड वाहने पुणे-बंगळूर महामार्गाने खंडाळा-शिरवळमार्गे लोणंदकडे वळविण्यात येतील.
सातारा–फलटण : बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव–पुसेगाव–ताथवडे घाटमार्गे फलटणकडे वाहतूक वळविण्यात येणार आहे.
फलटण–सातारा : फलटणहून येणारी वाहने ताथवडे घाट–पुसेगाव–कोरेगाव मार्गे साताऱ्याकडे येतील.
पर्यायी आदर्की मार्ग : आदर्की फाटा (फौजी ढाबा) येथून पिंपोडे बुद्रुक–सर्कलवाडी–शिरगाव घाट–जोशीविहीर मार्गे पुणे-बंगळूर महामार्गावरून साताऱ्याकडे जाता येणार आहे. तसेच आदर्की फाट्यावरून लोणंदमार्गे खंडाळा-शिरवळकडेही वाहतूक वळविण्यात आली आहे.
वाहतूक वळविण्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
वाढे-वडूथ पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय; २८ सप्टेंबरपासून वाहतूक बदल; सातारा–फलटणसह लोणंद मार्गासाठी पर्यायी रस्ते निश्चित
by Team Satara Today | published on : 23 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा