सातारा : जन माणसांच्या न्याय हक्कासाठी जीवाची बाजी लावून झगडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे प्राणघातक हल्ले पाहता त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेऊन नव्याने कायदा करावा असे मत सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग काटेकर यांनी मत व्यक्त केले. सातारा येथील हॉटेल सन इन येथे जन हक्क क्रांती मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, महारुद्र तिकुंडे, शंकर माळवदे, शिवाजी जाधव, प्रणव सावंत, गणेश आहिवळे, सुमित नाईक, भरतराव रावळ, कपिल राऊत, तन्मय नवले, गणेश वाघमारे आदी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्यांची संघटन शक्ती समाज उपयुक्त कामी यावे यासाठी जनहक्क क्रांती मंचाची निर्मिती केली आहे. जन माणसाच्या प्रलंबित प्रश्नांना दिशा देणे व त्यांना न्याय मिळवून देणे यासाठी या मंचाच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. लोकशक्तीच्या बळावर अपप्रवृत्तींशी झुंज देणे आणि शासनाचा योजनेचा लाभ सर्वसामान्य घटकांना मिळवून देण्यासाठी हा मंच कार्यरत राहणार आहे.
लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी मंचाच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार
सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणे त्याचबरोबर शासनाच्या दरबारी प्रश्नांची उकल करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण उभारणे यासाठी हा मंच कार्यरत राहणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये मूलभूत हक्काची जाणीव करून देणे व लोकहिताची कामे मार्गी लावणे यासाठी या मंचाच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार आहे.
सुनील भस्मे (सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी) यांनी माहिती अधिकार कायदा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या संदर्भात कार्यकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे निरसन त्यांनी यावेळी केले.
माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शंकर माळवदे यांनी शासन स्तरावरील दप्तर दिरंगाई मुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो याबाबत त्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
सातारा शहरात पहिल्यांदाच सामाजिक कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने एकाच छत्राखाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघटित शक्तीच्या बळावर अपप्रवृत्तींशी लढण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी मानले.
जनहक्क क्रांती मंच हा सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेला आहे. शासनाच्या योजना त्याचबरोबर रखडलेली विकास कामे मार्गी लावणे. व लोकहिताला प्राधान्यक्रम देणे याबाबत कार्यशाळेत मंथन करण्यात आले. पहिल्याच कार्यशाळेत जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी - श्रीरंग काटेकर; जनहक्क क्रांती मंचाची कार्यशाळा उत्साहात, ५० सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग.
by Team Satara Today | published on : 23 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा