सातारा जिल्हा परिषदेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सांगता; अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी वाजवला ढोल

by Team Satara Today | published on : 22 September 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गणेश चतुर्थीला प्रांगणात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्तीचे जिल्हा परिषद आवारातील कृत्रिम पाण्याच्या तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती लता कर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डीजेला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी स्वतः गळ्यात ढोल अडकवून उत्स्फूर्तपणे वादन केले. त्यांच्या या सहभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह भरला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीनंतर मान्यवरांच्या हस्ते कृत्रिम तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
उत्सवासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपलीच असून पारंपरिक ढोल वाजवून बाप्पाला निरोप देण्याचा आनंद वेगळाच होता, अशी प्रतिक्रिया अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी दिली. तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ संकल्पना न राहता आचरणाचा भाग झाली पाहिजे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नमूद केले. श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा मेळ घालत जिल्हा परिषदेने पर्यावरण रक्षणाचा दिलेला हा संदेश उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सवाआधी सातारा पोलिसांचा ‘प्रतिबंधक’ धडाका; २०१ सराईतांवर कारवाई
पुढील बातमी
अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना मिळणार स्वच्छ, सुसज्ज सुविधा

संबंधित बातम्या